भगवान परशुराम - अधर्माविरुद्धचा चिरंजीव धर्मयोद्धा

आज भगवान परशुराम यांची जयंती. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे भगवान विष्णूंच्या सहावा अवतार – राम , भार्गवराम किंवा परशुराम यांची जयंती. तृतीया दोन दिवस येत असेल तर प्रदोषकाळी तृतीया ज्या दिवशी पडेल ती म्हणजे भगवान परशुरामांची जयंती. त्यामुळे या वर्षी काही ठिकाणी १२ मे ला परशुराम जयंती साजरी केली गेली , तर काही ठिकाणी आज म्हणजे दिनांक १३ मे ला साजरी होत आहे.


श्री दत्तमाहात्म्याप्रमाणे मध्यान्ही सिहलग्नी प्रभू पृथ्वीवरील अन्यायी, अत्याचारी राजांविरुद्ध युद्ध करण्यास्तव या पृथ्वीवर प्रकट झाले.

महर्षी जमदग्नी आणि रेणुका माता यांचे सुपुत्र, मातृ – पितृ भक्तीचे सर्वोत्तम आदर्श म्हणजे भगवान भार्गवराम. भगवान परशुरामांचे रूप म्हणजे हातात परशु, युद्धास सज्ज आणि चेहऱ्यावर क्रोधाग्नी असे सर्व चित्रामध्ये दाखवले जाते. भगवान परशुरामांनी आपले आयुष्य म्हणजे अन्यायाचा निरंतर लढाच बनविले आहे. अन्याय, अत्याचार करणारे अधर्मी हे सदासर्वकाळ वेगवेगळ्या नावांनी जगात असतातच त्यामुळे अधार्मिकांना – जे समजविण्याच्या मार्गाने धर्मपालन करू शकत नाही – अशा पातळीवरच्या अधार्मिकांना संपविणारे भगवान परशुराम हे ही सदा या भूतलावर आहेत, चिरंजीव आहेत.

भगवान परशुरामांच्या जीवनातील कथा खूप प्रेरणास्पद आहे. वारंवार त्यांच्या गुणांचे गान करावे अशाच त्यांच्या लीला आहेत. लीलांचे गान करण्याबरोबरच लीलाचिंतन करणेही भक्त व साधक यांना आध्यात्मिक व लौकिक जीवनात प्रगतिकारक ठरते, त्यामुळे आज आपण भगवान परशुरामांच्या लीलांचे चिंतन करू या.

भगवान परशुराम हे ब्राह्मण ऋषी कुळात जन्माला आलेले. आणि त्यांनी क्षत्रियांचा संहार केला त्यामुळे ते ब्राम्हणांचे देव व क्षत्रियांचे संहारक अशी त्यांची प्रतिमा काही भेदभाव पसरविणाऱ्या शक्ति वारंवार मनावर बिम्बविण्याचा प्रयत्न करतात. आणि दुर्दैवाने आपलेच काही बांधव या भ्रमास खरे मानून प्रत्यक्ष परमेश्वराच्या अवतारास जातीत बंदिस्त करू पाहतात. खरे म्हणजे वर्ण व्यवस्था हा एक पूर्ण वेगळाच विषय आहे. जात म्हणून जो काही प्रकार सध्या अस्तित्वात आहे, त्यापेक्षा वर्णव्यवस्था वेगळी असावी असे वाटते. असो. तूर्तास आपण भगवान परशुरामांच्या लीलान्बद्दलच बोलू.

भगवान विष्णूंचे जे विविध अवतार झाले त्याच्या मुळाशी जात किंवा तथाकथित जातीभेद उच्च नीच भेदभाव असे काही कारण नसून केवळ अधर्माचा नाश, धर्म स्थापना आणि भक्तांवर कृपा हीच कारणे दिसतात. कूर्म किंवा मत्स्य अवतारात – मनुष्य रुपात अवतार घेण्याऐवजी कूर्म किवा मत्स्य रूप हे पृथ्वी वाचविण्यास उपकारक ठरले होते. याशिवाय वेगवेगळ्या असुरांना दिलेल्या वरदानांमुळे, त्यांचा नाश होईल अशा रुपात प्रभू अवतार घेतात. नृसिंह अवतारात तर प्रभू केवळ खांबातून प्रकट झाले, तेही न मनुष्य न प्राणी अशा रुपात. परमेश्वराच्या लीलांचा अर्थ लागणे कठीणच. पण अवतारांचे मूळ कारण बघितल्यास या सगळ्या कथांमध्ये (कुणी खऱ्या मानो वा न मानो) कुठल्याही जातीचे वर्चस्व निर्माण करण्याचा उद्देश मात्र मुळीच नाही. कारण, परमेश्वरास भेद हा कसा मान्य असेल? परमेश्वर सर्वव्यापी असून लीला म्हणून काही देह धारण करतो, त्याने त्याचे सर्वव्यापित्व बदलत नाही. त्यामुळे भगवान परशुराम म्हणजे केवळ ब्राह्मणांचे देव असे म्हणणे म्हणजे सनातन संस्कृतीबद्दल अज्ञानाचे लक्षण आहे.

आता याच मुद्द्याचा आध्यात्मिक दृष्टीकोन बघू. नामसाधनेमध्ये – परमेश्वराचे अमुक नाम हे सर्वश्रेष्ठ आणि अमुक नाम हे मात्र कनिष्ठ असा भेदभाव करणे हा नामापराध आहे. मग परमेश्वराच्या विविध अवतारांमध्ये भेद करणे आणि एकमेकांमध्ये द्वेषाची आणि भेदाची बीजे पेरणे हा केवढा मोठा अपराध आहे. भगवान परशुराम, राम अथवा कृष्ण हे सर्व भगवान विष्णुंचेच अवतार. सर्वांनी अधार्मिकांपासून पृथ्वी मुक्त केली. यात भेदभावाचा प्रश्न येतोच कुठे? जसे आपण जय श्रीराम म्हणतो, जय श्रीकृष्ण म्हणतो, तितक्याच सहजतेने जय परशुराम का नाही म्हणू शकत? (आता तर आपल्या रामाचे नाव घेणेही सांप्रदायिक म्हटले जाते.)

अजून एक मुद्दा म्हणजे, परमेश्वर हा कुठल्याही मर्यादेत बांधणे अशी संकल्पना सनातन हिंदू संस्कृतीत कुठेही नाही. परमेश्वर हा अनादी आहे, अनंत आहे आणि हे समजल्यामुळेच आपली संस्कृती पण अनादी – अनंत आहे. जेव्हा परमेश्वराच्या सगुण साकार रूपाचे चिंतन आपण मानवी बद्ध मर्यादेमध्ये किंवा आजच्या भाषेत जातीत करतो, तेव्हा आपण परमेश्वर चिंतन करीत नाही. त्यामुळे जे साधक असतील त्यांनी हा मुद्दा विशेष लक्षात घ्यावा अशी प्रार्थना करावीशी वाटते.

आपण ती कथा जाणतोच, त्यामुळे परशुराम भगवान क्रोधीत झाले आणि अधार्मिकांचा संहार सुरु झाला. सहस्रार्जुनाने बलात् जमदग्नी महर्षींच्या कामधेनुचे हरण केले. वास्तविक पाहता राजाला काय कमी? पण तरीही सहस्रार्जुनाने हा अधर्म केला. हे परशुरामांना कळले तेव्हा ते क्रोधीत झाले. आणि युद्ध सुरु झाले. यात सहस्रार्जुनाचा वध झाला. (खरे म्हणजे सहस्रार्जुन हा दत्तभक्त आणि परमेश्वराच्या हातूनच मृत्यू यावा असा वर असल्यामुळे अर्जुनाची बुद्धी अधर्म करण्यास प्रवृत्त झाली आणि परशुरामांच्या हातून वध झाला. त्यामुळे हा प्रसंग दोन दत्तभक्त सहस्रार्जुन व परशुराम यांची लीलामात्र आहे. ) याचा बदला म्हणून अर्जुनपुत्रांनी जमदग्नी महर्षींची हत्या केली, तेही ते नि:शस्त्र, एकटे असताना आणि विशेषतः योद्धापुत्र परशुराम जवळ नसताना. नि:शस्त्र शत्रूवर, जो शत्रू युद्ध करण्यास प्रवृत्त नाही असा, असहाय्य अशा तर शत्रूवरही वार करणे आणि त्याला मारणे हा अधर्म – क्षत्रियांस अनुचित असा व्यवहार मानला गेलाय, मग सहस्रार्जुनपुत्रांनी तर एका शांत, अक्रोधी,  निर्वैर, अहिंसक महर्षींना मारले. हा अधर्म सहन न झाल्यामुळे, भगवान परशुरामांनी सर्व अधार्मिकांविरुद्ध युद्ध सुरु केले, तेही एकट्याने.
कामधेनु चोरणे हा मुद्दा इतका मोठा अधर्म का ठरला आणि भगवान परशुराम क्रोधीत का झाले याचाही विचार करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत गाय ही आई मानलेली आहे, केवळ एक प्राणी नव्हे. मातेचा क्रय विक्रय होत नसतो. सहस्रार्जुनाने कामधेनु धनाच्या बदल्यात विकत घेण्याचा प्रयत्न केला. आणि जमदग्नी ऋषींनी हे मानले नाही तर गायीचे हरण केले, गाय असहाय्य होती, दु:खी होती, तरीही केवळ सत्ताधारी असल्यामुळे आपण करतो ते योग्यच असे मानून अर्जुनाने हे कृत्य केले. (जे हिंदू बांधव गायीना कसायांना केवळ अर्थलोभामुळे विकतात, त्यांनी ही हा इतिहास विचारात घ्यावा.)

सहस्रार्जुनपुत्रन्नीही मदांध होऊनच ऋषीहत्येचे पाप केले. हा मुद्दा पुन्हा एकदा सांगते, जातीचा नाही. सत्तेत मदांध झालेले अनेक क्रूर राजे होऊन गेले आणि आजही आहेत. राजाने प्रजेचे रक्षण पिता ज्याप्रमाणे पुत्रांचे रक्षण करतो, त्याप्रमाणे करणे हे राजाचे कर्तव्य आहे. पण राजाच भक्षक बनला तर प्रजेने काय करावे? ज्या राजाच्या विश्वासावर प्रजा आनंदाने निश्चिंत राहते, त्या राजानेच त्या असहाय्य प्रजेवर अन्याय सुरु केला, लूट सुरु केली तर प्रजेने प्रतिकार करावा की करू नये?

आज आपल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध जी चीड आहे, ती का आहे? ती जातीवर अवलंबून आहे की अन्यायाविरुद्ध आहे? भगवान परशुराम क्रोधीत का झाले आणि त्यांनी अधार्मिकांचा संहार का केला – याचे उत्तर आजच्या आपल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या रागातच आहे. आणि शासन करूनही सुधारणार नाही अशा पातळीवर जेव्हा अधर्म सुरु होतो तेव्हा अधार्मिकाचा संहार करावा लागतो. आणि ज्यापद्धतीने भगवान परशुरामांनी अधार्मिकांचा संहार केला ते पाहता असे दिसते त्याकाळी खूप राजे मदांध झाले असतील आणि म्हणूनच विष्णूंचा अवतार झाला असावा.

भगवान परशुराम हे क्षत्रियांचे शत्रू होते असा जो भ्रम पसरविला जातो, तो पूर्णपणे खोटा आहे. रामायणात असे उल्लेख आहेत की ज्यावरून सिद्ध होते, परशुराम हे राजा दशरथ आणि राजा जनक यांच्याकडे नेहमी जायचे. ते पण नेहमीच परशुरामाचे आदरातिथ्य करायचे आणि भगवान त्यांना आशीर्वाद ही द्यायचे. याचे स्पष्ट उदाहरण सीतास्वयंवर आहे, ज्यात अनेक राजे होते. जर भगवान परशुरामांनी सर्व क्षत्रियांना मारले असते तर हे सगळे राजे तेव्हा आनंदाने राज्य कसे करत होते? पण प्रभू त्याच्यावर प्रसन्न होते कारण ते धर्मपूर्वक राज्य करत होते. आणि प्रभू रामचन्द्रांशी भेट होईपर्यंत परशुरामांचे अवतारकार्य सुरु होते अर्थात अधार्मिकांविरुद्ध युद्ध सुरूच होते. तरीही धर्मपूर्वक राज्य करणारे राजे तेव्हा होतेच.

महाभारतातील उल्लेखाप्रमाणे राजर्षी होत्रवाहन जे अंबेचे आजोबा होते, ते भगवान परशुरामांचे प्रिय सखा होते आणि स्वत: भगवान त्यांना भेटायला गेले होते. अंबेचे दु:ख पाहून भगवान परशुरामांनी अम्बेस न्याय मिळावा म्हणून आणि तिचे दु:ख दूर व्हावे म्हणून भीष्मांशी युद्ध सुद्धा केले होते.

ह्या सगळ्या लीलाचिंतनातून मला हेच समजले की, परमेश्वर नेहमीच अधर्माविरुद्ध लढण्यास अवतार घेतो आणि आपल्यालाही अन्याय, अत्याचार व अधर्म यांच्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. याच परमेश्वराने ब्राह्मणकुळात जन्म घेतलेल्या परंतु अधर्मी असलेल्या रावणाचा वध केला, याच परमेश्वराने  महाभारतात कौरवांचा संहार करविला. त्यामुळे परमेश्वर अधर्माविरुद्ध आहे, जातीचे बंधन त्याला नाही.

तसेच अन्याय सहन करणारी अहिंसा ही अन्याय आणि अधर्म वाढविणारी आहे त्यामुळे अन्याय व अधर्माचा प्रतीकार केलाच पाहिजे.

भगवान परशुराम हे आपल्याला सर्वांना सर्व भेदभाव विसरून, अधर्माविरुद्ध लढण्याची शक्ती देवो, अशी आजच्या दिवशी त्यांना प्रार्थना.   

हा विचारयज्ञ आहे, त्यामुळे आपले विचार अवश्य कळवा...:)     

हा लेख इंग्रजीत नारायणकृपा वर पण उपलब्ध आहे : कृपया इथे टिचकी द्या : 

Bhagwan Parashuram : Eternal Warrior Against Adharma            

Comments